कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेच्यावतीने १८ विशेष पथके तैनात केली आहेत. या पथकामार्फत गर्दी नियंत्रित करण्याबरेाबरच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
कोरोना कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही. शहरात दिवाळी सणानिमित्त होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आणि सतर्क झाले आहे. शहरातील महत्वाची १८ ठिकाणी विशेष पथके तैनात केली आहेत. एकूण १०८ कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक पथकामध्ये ६ कर्मचारी असून ही पथके सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत गर्दी नियंत्रित करणे आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजवणी करतील, असेही डॉ. बलकवडे यांनी स्पष्ट केले आहे.