पुणे (प्रतिनिधी) : पंढरपूर पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून ११०० कोटींचा खर्च करण्याबरोबर या माध्यमातून ३५० किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मोदी यांच्या हस्ते आज (मंगळवार) देहूतील संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर ते बोलत होते.

पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम तीन  टप्प्यात तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचे काम २ टप्प्यात करण्यात येईल, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. याशिवाय महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ, मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूर येथील दीक्षा भूमीचाही विकास करण्यात येईल, असे मोदी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे. वीर सावरकरांना स्वातंत्र्य लढ्यात शिक्षा झाली तेव्हा ते तुकाराम महाराजांचे अभंग तुरुंगात म्हणत, अशी आठवण मोदींनी सांगितली. भारत जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. आपण जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहोत. याचे श्रेय भारत देशातील संत परंपरा तसेच ऋषींना असल्याचे मोदींनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, देहू मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे योगेश देसाई, पंढरपूर देवस्थान उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसरे, मारुतीबाबा कुरहेकर, आचार्य तुषार भोसले आदी उपस्थित होते.

तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा दूर करून सश्रद्ध समाज तयार करण्याचे काम केले. त्यांच्या शब्दांचे धन कोणीही बुडवू शकले नाही. इंद्रायणीने त्यांचे शब्द पुन्हा वर केले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे काम पंतप्रधान करत आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. पंतप्रधान आपले वारकरी आहेत. वारकऱ्यात सारेच सेवक असतात. आपले पंतप्रधान प्रधानसेवक आहेत. संपूर्ण जग आपले आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले. तेच मानून संपूर्ण जगाला लस पोहोचवण्याचे काम मोदींनी केले, असे फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांचे स्वागत सर्व वारकरी हे टाळ-मृदुंगाच्या गजरात करणायत आले. त्यासाठी २०० ते २५० वारकऱ्यांना परवानगी मिळाली होती. यात टाळकरी, मृदुंगधारी, विणेकरी, पताकाधारी, हंडाकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला अशांचा समावेश होता.