कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपुर्वी कोल्हापुरातील शिवसैनिकांनी मातोश्रीवर चर्चा केली, यानंतर 19 वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उद्धवसेनेत सुंदोपसुंदी पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या दिनांक 9 जानेवारीपासून दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

या नियोजित दौऱ्यापुर्वी कोल्हापूर ठाकरे गटाची बैठक ही पार पडली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शहरात आणि हातकणंगले मतदारसंघात अशा दोन जाहीर सभा होणार आहेत. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील घडामोंडीवर भाष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उद्या दुपारी दोन वाजता आदित्य ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते गारगोटीला रवाना होतील. दुपारी 3 वाजता हुतात्मा क्रांती चौक गारगोटीत जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता मिरजकर तिकीट कोल्हापुरात जाहीर सभा होईल. पुन्हा दुसऱ्या दिवशी बुधवारी यशवंत मंगल कार्यालय, हुपरी येथे मेळावा होईल.

दरम्यान पक्षातील वेगाने घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांचा हा दौरा होत असल्याने अंतर्गत सुरु असेलेली धुसफूस मिटवणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. तसेच लोकसभेच्या आडून विधानसभेसाठी काही संकेत मिळणार का ? याचीही चर्चा आता वेग धरु लागली आहे.