हातकणंगले (प्रतिनिधी) : तीस टक्के व्याज दराने कर्ज देऊन महिलांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी फसविले आहे. अशा कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या महिलांची मायक्रो फायनान्सची कर्जे माफ करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह आज बंडखोर सेना पक्षाच्या वतीने अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. कुंभोज फाटा येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मायक्रो फायनान्स कंपन्यांची महिलांची कर्जे माफ झालीच पाहिजेत, हप्त्यासाठी तगादा लावणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या एजंटांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत, निरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांची कर्जे माफ करता मग आमची का नाही ? असा सवाल करीत मोर्चा तहसीलदार कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी महिला आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांनी तहसीलदार कार्यालयाचा परीसर दणाणून गेला. यावेळी तहसीलदार प्रदिप उबाळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या मोर्चात महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.शिवालीताई आवळे,अस्मिता आवळे, पूनम आवळे,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विकास अवघडे, सांगली जिल्हाध्यक्ष निलेश मोहिते, युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक भंडारे, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुरेश आवळे, मिरज तालुकाध्यक्ष सुनिल पांढरे, हातकणंगले तालुका महिला आघाडी अध्यक्षा दिपाली अवघडे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.