कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाचा समृद्ध शैक्षणिक वारसा वृद्धिंगत करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज (मंगळवार) केले. मुंबई येथील राजभवनातून डॉ. शिर्के यांच्या निवडीची घोषणा आज सायंकाळी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले की, शिवाजी विद्यापीठामध्ये अध्यापक, विभागप्रमुख, विविध अधिकार मंडळांवर सदस्य, कुलसचिव आणि प्र-कुलगुरू आदी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ज्या विश्वासाने सोपविण्यात आल्या आहेत. त्यांना सर्वोतोपरी न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. या प्रामाणिक प्रयत्नांचे फलित म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी माझ्याकडे आली आहे.
विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांसह समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी माझी ही कारकीर्द समर्पित राहील. आपल्या शिवाजी विद्यापीठाला देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ बनविण्याच्या कामी समाजातील सर्वच घटकांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.