मनोरंजन ( प्रतिनिधी ) झोमॅटो कंपनीचे सीईओ दीपंदर गोयल यांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato वर दिसणार्‍या सवलतीच्या ऑफरबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यांनी कबूल केले आहे की, झोमॅटो प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे सवलती दाखवल्या जातात त्या ग्राहकांची दिशाभूल करत आहेत आणि हे बदलणे आवश्यक आहे.


खरं तर, यूट्यूबर रणवीर अल्लाबदियाच्या पॉडकास्ट ‘द रणवीर शो’ मधील संभाषणादरम्यान, दीपंदर गोयल यांना झोमॅटो ग्राहकांना मोठ्या सवलती कशा देता हे विचारण्यात आले. यावर गोयल म्हणाले, “सवलती फार मोठ्या नाहीत, त्या फक्त दृश्यमान आहेत.” झोमॅटोचे संस्थापक गोयल म्हणाले की आमच्या प्लॅटफॉर्मवर “50 % सवलत रु ८० पर्यंत” सारख्या ऑफर चालतात. ही 50 % सूट नाही, फक्त 80 रुपये सूट आहे. ऑर्डर 400 रुपये असल्यास, ती फक्त 20 % सूट आहे. त्यामुळे ही सवलत देण्याची पद्धत ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी मान्य केले.


गोयल म्हणाले की, मी या सवलतीला प्रामाणिक म्हणत नाही. तुम्ही तुमच्या ग्राहकाला काही सांगत असाल तर ते प्रामाणिक असले पाहिजे. यामध्ये 80 रुपयांची सूट असावी. 50 % सूट 80 रुपयांपर्यंत नसावी. स्पर्धा अशीच सुरू राहिल्यास आपण काहीही बदलू शकणार नाही, अशी कबुलीही गोयल यांनी दिली. शोमधील संभाषणादरम्यान, त्यांनी स्विगीचे संस्थापक आणि सीईओ श्रीहर्ष मॅजेती यांच्याशी असलेल्या नातेसंबंधाबद्दल देखील सांगितले. व्यवसायात प्रतिस्पर्धी असूनही, दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.