कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिये (ता. करवीर) येथे शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारने कृषीक्षेत्राशी संबंधित मंजूर केलेल्या विधेयकाचे साखर वाटप करून स्वागत करण्यात आले. अत्यावश्यक वस्तू कायद्यातून शेतमाल वगळणे, शेतकऱ्यांना देशाच्या कोणत्याही बाजारपेठेत शेतमाल विकण्याची मुभा देणे, आंतरराज्य शेतमाल विक्रीला परवानगी, व्यापारी आणि प्रक्रियादारांनासह रिटेल दुकानदारांना थेट शेतात जाऊन शेतमाल खरेदी करण्याची परवानगी देणे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला चालना तसेच शेतीच्या क्षेत्रातील खाजगी गुंतवणूक वाढवणे आदी उद्दिष्टे या विधेयकामुळे साध्य होणार आहेत.

तसेच या कायद्यामुळे बाजार समितीमध्ये किमान भावाची व्यवस्था कायम राहणार आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये आणि खुल्या बाजारातही माल विकता येणार आहे. अनेक दशकांपासून देशातील शेतकरी अनेक प्रकारच्या जाचक अटींमध्ये व बंधनात अडकले होते. त्यांना मध्यस्थांचा सामना करावा लागत होता. संसदेत मंजूर झालेल्या या विधेयकामुळे या बंधनातून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे. तसेच या विधेयकामुळे हमीभावाची सरकारी खरेदी सुरूच राहणार आहे. त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

तीनही विधेयके शेतकऱ्यांच्या फायद्याची असून शेतीव्यवसायाला स्वातंत्र्याकडे घेऊन जाणारी आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने सदर बिलाचे स्वागत करण्यात आले असून त्या आनंदाप्रीत्यर्थ कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने साखर वाटप करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष अॅड. माणिक शिंदे, संपर्कप्रमुख उत्तम पाटील, शिवसेना शाखाप्रमुख उत्तम पाटील, उल्हास पाटील, धनाजी चौगुले, केबी कुटाळे, बाबासो गोसावी, एकनाथ उगले, धनाजी चौगुले, उत्तम पाटील, सतीश चौगुले आदी उपस्थित होते.