नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज (सोमवारी) निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये संसदेतील ९९.१८ टक्के खासदारांनी मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली, तर महाराष्ट्रातील २८३ आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल २१ जुलै रोजी लागणार आहे, तर २५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.

राष्ट्रपतीपदासाठी संध्याकाळी पाच वाजता मतदान संपले. या निवडणुकीमध्ये एनडीएच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मतदान केले, तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खासदार आणि आमदारांनी मतदान केल्याची माहिती आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुपारी चार वाजता मतदान केले. तृणमूल काँग्रेसने विरोधकांचे उमेदवार यशवंत सिंन्हा यांना पाठिंबा दर्शवला आहे. राहुल गांधी यांनी पावणे चार वाजता, तर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे शहजील इस्लाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातमधील आमदार एस. जडेजा, ओडिशामध्ये काँग्रेस आमदार मोहम्मद मुकीम यांनी मुर्मू यांना मतदान केले. गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधल एस. जडेजा यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचा दावा केला आहे.