मुंबई (प्रतिनिधी) : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांचा भारतात अनेक वर्षांपासून घरांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, याच मसाल्यांवर आता परदेशात बंदी घालण्यात आली आहे. सिंगापूर, हाँगकाँगबरोबरच नेपाळमध्येही या दोन कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी टाकली आहे. तर नेपाळमध्ये भारताच्या एव्हरेस्ट, एमडीएच मसाल्यांच्या विक्री आणि आयातीवर बंदी घालण्यात आली आहे
नेपाळमधील अन्न गुणवत्ता नियंत्रण विभागानं या मसाल्यांमध्ये एथिलीन ऑक्साईड असण्याच्या संशयावरून बंदीचे हे निर्देश दिले आहेत. सध्या या मसाल्यांची तपासणी सुरु असून, त्यात एथिलीन ऑक्साईडचे अंश शोधण्यासाठीचं परीक्षण सुरु करण्यात आलं आहे.
नेपाळमधील अन्न गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवरी आयातबंदीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोबतच बाजारपेठांमध्येही या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच काही देशांच्या अहवालामध्ये या मसाल्यांमध्ये हानिकारक घटक असल्याची बाब समोर येताच हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या घडीला नेपाळमध्ये या मसाल्यांचं परीक्षण सुरू असून त्यांचा परीक्षण अहवाल समोर येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. काही देशांनी एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांच्या वापरावर बंदी घातली असून येत्या काळात ब्रिटन, न्यूझीलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही हा कठोर नियम लागू केला जाण्याची चिन्हे दिसत आहेत.