कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाडमधील ग्रामदैवत हजरत दौलतशहा वली यांच्या उरुसाला सुरूवात झाली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या समानतेची शिकवण देणाऱ्या दौलतशहा दर्ग्याच्या उरूसाचे मानकरी गाव कामगार पोलीस पाटील रावसाहेब पाटील यांच्या हस्ते गलेफ व संदल अर्पण करण्यात आले. तर पोलीस प्रशासनातर्फे मानाचा गलेफ अर्पण करून उरूसाला प्रारंभ करण्यात आला.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक व परंपरा असलेल्या हजरत दौलतशहा वली दर्ग्याच्या उरुसाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत शाही संदलने सुरवात झाली असून पाच दिवस या उरुसाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे देशात यात्रा-जत्रावंर बंदी होती. दोन वर्षांनंतर प्रथमच उरुस भरविला आहे. यानिमित्त तीन दिवस उरुस भरणार आहे.

यावेळी राजवाडा ते दर्गा अशी मिरवणूक काढण्यात आली होती. बॅन्ड पथकने संदल मिरवणूक दर्ग्यात आल्यावर माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, अजित पाटील, सपोनि. बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील आणि दर्गाह विश्वस्तांच्या हस्ते पवित्र गलेफ आणि फुलांचा गलफ चढविण्यात आला. यावेळी खतम देण्यात आला. तसेच दर्ग्यावर हातांचे पंजे मारण्यात आले. दौलतशहा भाजीपाला मार्केट कमिटीतर्फे उद्या (गुरुवार) सकाळी तर उरूस कमिटीतर्फे शुक्रवारी दर्गाह येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, दादासाहेब पाटील, बापूसाहेब आसंगे, उदय डांगे, अख्तर मुल्ला, युनूस मुल्ला, अजित देसाई आदी उपस्थित होते.