तुरंबे (प्रतिनिधी) : राधानगरी वन्यजीव विभागाच्या हद्दीतून विना परवाना बॉक्साईट घेऊन जाणारे ट्रक आणि दोघांना वन्यजीव विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यांच्याकडून २५ टन बॉक्साईट सदृश्य गौण खनिज साठा ताब्यात घेतला आहे. तर महसूल विभागानेही मिसाळवाडी गावाच्या हद्दीत ३५ ब्रास मुख्य गौण खनिज साठा असल्याची माहिती दिली आहे. गेल्या वर्षभरापासून राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रात उघडपणे बॉक्साईटची वाहतूक होत असताना कोणत्याही अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई केली नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्राशेजारी मागील वर्षभरापासून विना परवाना बॉक्साईट सदृश्य गौण खनिज साठ्यांची राजारोषपणे वाहतूक होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात होते. मात्र संबंधित विभागाने कोणतीच कठोर कारवाई केली नसल्याने, तालुक्यात विना परवाना गौण खनिज उत्खानाची वाहतूक होत असल्याचे बोलले जात आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी मिसाळवाडी गावाच्या हद्दीतून बॉक्साईट घेऊन जात असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांना मिळाली. त्यांनी तात्काळ वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे वनपाल महेश पाटील वनरक्षक प्रमोद पाटील अंबाजी बिराडे बळवंत-हाठोड यांच्यासह वन्यजीव विभागाच्या पथकाला पडळी गावाच्या चेकपोस्ट नाक्यावर पाठवले यावेळी बॉक्साईट घेऊन जाणाऱ्याला एका ट्रकला पथकाने अडवले.

त्यातील चालकाशी चौकशी केली असता बॉक्साईट सदृश्य साठा असल्याचे दिसून आले. या संदर्भात वन्यजीव विभागाचे अधिकारी आणि नायब तहसीलदार विजय जाधव यांच्या संयुक्त पथकाने मिसाळवाडी गावाच्या हद्दी शेजारी जाऊन चौकशी केली असता, मोठ्या प्रमाणात गौण खनिज साठा असल्याचे त्यांनी सांगितले. अभयारण्य क्षेत्राशेजारी अशा प्रकारे बॉक्साईट सदृश्य साठ्याची वाहतूक होत असताना संबंधित विभाग कोणतीच कठोर कारवाई करत नाही यामागचे नेमके कारण तरी काय ? हे जिल्हाधिकारी यांनी उघड करणे गरजेचे आहे. अन्यथा अभयारण्याचा ऱ्हास होण्यास वेळ लागणार नाही, असेही नागरिकांमधून बोलले जात आहे. या संदर्भात तहसीलदार मीना निंबाळकर यांना विचारले असता, असा प्रकार होत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.