मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत गेल्यावर अनेक जण समुद्राचा नजारा अनुभवण्यासाठी मरीन ड्राईव्हला भेट देतात. तरुण- तरुणीचे फेव्हरीट ठिकाण म्हणून मरीन ड्राईव्हची ओळख आहे. सध्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मरीन ड्राईव्हवर संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी तरुणांसोबत घेतलेल्या फोटोची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.  

काही तरुणांनी ओ काका, आमचा एक फोटो काढा की, असे म्हणत मंत्री भरणे यांना फोटो काढण्याची विनंती केली. तसेच त्या तरुणांनी राज्यमंत्री असलेल्या   भरणे यांच्या हातात मोबाईल देत फोटोसाठी पोझही दिली. भरणेंनीही कुठलेही आढेवेढे न घेता तरुणांचे अनेक फोटो काढले. तरुणांच्या विनंतीनंतर राज्यमंत्री  भरणे चक्क फोटोग्राफर झाले. यावेळी भरणे यांनी तरुणांसोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्या. यावेळी मुलांनीही भरणे यांच्यासोबत फोटोसेशन केले.