सांगली (प्रतिनिधी) : आम्ही मागे लागल्यानेच मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडले. घरात बसून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येत नाही. त्यासाठी बांधावर जावे लागते, असा उपरोधिक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज (रविवार) लगावला. ते सांगली येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांतदादा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून राज्यातील स्थिती पाहावी, अशी आम्ही अनेकवेळा मागणी केली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या काळात तरी मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून शेतीची पाहणी करावी. आम्ही सातत्याने मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर अखेर मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत आहेत. आता त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकून मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखवू नये. राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राकडे रितसर मागणी केली आहे का? कागदावर नुकसानीचा तपशील नोंदवला आहे का? याबाबत अजून काहीच काम झालेले नाही.
मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. त्यात त्यांची काहीच चूक झाली नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी पत्राला उत्तर देताना किमान राज्यपालांच्या वयाचे तरी भान राखायला पाहिजे होते. त्यांनी दिलेले उत्तर योग्य नाही. सांगली महापालिकेत एकहाती सत्ता असताना स्थायी समिती सभापती पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक का वाढते? आपले ४३ नगरसेवक असताना त्यांना सहलीला का पाठवावे लागते? राज्यात इतर ठिकाणी काही अडचण येत नाही. मग इथेच असे का ? याचे भाजपच्या नगरसेवकांनी आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला.