मुंबई  (प्रतिनिधी) : लोकशाहीत राजकारणाचा संघर्ष असतोच. पण  केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षांमार्फत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या चौकशीचे सत्र सुरु आहे. भाजपचे लोक जंगलात राहतात का ?  त्यांच्या संपत्ती वैध आहे का?  असे प्रश्न उपस्थित करत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आज (मंगळवार)  भाजपवर निशाणा साधला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  

अनिल देशमुख यांच्या अटकेवर ते म्हणावे की, हे राजकारण नाही, तर निव्वळ सूडाच्या भावनेनं सध्याच्या घडामोडी घडत आहेत. अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब यांचा नंबर असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. यावर उत्तर देताना २०२४ नंतर आम्हीही यादी करू,  आम्हीही तयारी करू, असा इशारा त्यांनी  यावेळी दिला.

आरोप करणाऱ्यांना पळून जाण्यास केंद्राचे पाठबळ मिळते. आणि ज्याच्यावर आरोप झाले, तो चौकशीला हजर राहिल्यावर अटक होत आहे.  तसेच हे सर्व पाहून भाजपाचे नेते टणाटणा उड्या मारतायेत. दिवाळीनंतर आम्ही असं करू, तसं करू म्हणत आहेत. पण तेव्हा यांना बाथरूममध्ये स्वतःची तोंडं लपवून बसावं लागेल, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.