सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील सातेरी परिसरातील डोंगरी भागातील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांची सध्या अवस्था बिकट झाली आहे. अरूंद रस्त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासकीय निधीअभावी दऱ्याखोऱ्यातील नागमोडी वळणाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.  

करवीर तालुक्यातील सातेरी-महादेव पर्यटन क्षेत्रातील डोंगरी भागातील वाहतुकीचे रस्ते पावसाळ्यानंतर खराब झाले आहेत. येथे असणाऱ्या नागमोडी वळणांच्या रस्त्याच्या रूंदीकरणाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. येथे असणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक ठप्पच असते. डोंगरी भागात वसलेल्या दहा ते बारा गावांच्या वाहतुकीचा प्रश्न गेल्या पाच दशकात सुटलेला नाही. यामध्ये आमशी ते वाघोबावाडी, शिपेकरवाडी ते धोंडेवाडी, स्वयंभूवाडी ते महादेव मंदीर, नरगेवाडी ते सातेरी, बेरकळवाडी ते चाफोडी, केकतवाडी ते सातेरी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम शासकीय निधी अभावी रखडले आहे.