नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड) किमती ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रतिलिटर ३ रुपयांनी कमी होऊ शकतात. याआधी फेब्रुवारीमध्ये कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ९० डॉलरच्या जवळ होता.

कच्च्या तेलाच्या दारात घसरण सुरूच आहे. जूनमध्ये क्रूड १२५डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचले होते. सध्या ते प्रति बॅरल ९२ डॉलरवर व्यापार करत आहे. म्हणजेच ते आतापर्यंत सुमारे २६ टक्क्यांनी कमकुवत झाले आहे. युरोप, चीनमधील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर दबाव आहे. इतर अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अजूनही अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत क्रुडची मागणी पुढे कमजोर राहण्याची भीती आहे.

आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी आणि करन्सी) अनुज गुप्ता यांनी सांगितले की, क्रूड येत्या काही दिवसांत ८५ डॉलरपर्यंत खाली येऊ शकते. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दरही प्रतिलिटर २  ते 3 रुपयांनी कमी होऊ शकतात. रेटिंग एजन्सीचे सह-समूह प्रमुख तथा उपाध्यक्ष प्रशांत वशिष्ठ यांनी सांगितले की, देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर ५५-६० पैशांनी वाढतात. जेव्हा कच्चे तेल प्रति बॅरल १ डॉलरने महाग होते. दुसरीकडे, कच्चे तेल १ डॉलरने स्वस्त झाले. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी ५५-६० पैसे प्रति लिटर कमी होते.

२२ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून मोठा दिलासा दिला होता. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क ८ रुपयांनी, तर डिझेलवर ६ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तेव्हापासून आजतागायत पेट्रोलच्या दरात कोणतीही कपात झाली नसून केवळ दर वाढले आहेत.