कुंभोज (प्रतिनिधी) : सुकाणू समितीच्या सल्ल्यानुसार बँकेचा कारभार चालवणार असून, सभासदांनी घेतलेल्या कर्जावर एक अंकी व्याजदर व चांगला लाभांश देण्यासाठी संस्था व सर्व संचालक बांधिल आहेत, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन अर्जुन पाटील यांनी केले.

प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल सर्व नूतन संचालकांचा व सुकाणू समिती सदस्यांचा रा. शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी हातकणंगले यांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात, प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदयराव शिंदे उपस्थित होते.

शिक्षक समितीचे जिल्हा नेते ज्योतिराम पाटील म्हणाले, बँकेची सध्याची स्थिती पाहून लवकरच श्वेतपत्रिका जाहीर केली जाईल. सत्ताधारी आगाडीने गेल्या १३ वर्षांत कोणालाही विश्वासात न घेता केलेल्या अनागोंदी कारभाराला कंटाळून सभासदांनी परिवर्तन घडवले आहे. राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील म्हणाले, सत्ताधारी आघाडीने मागील काळात बँकेत दाखवलेला नफा हा चुकीचा असून, प्रत्यक्षात तो नफा वेगळाच आहे. त्याची नूतन संचालकांनी चौकशी करून सर्वसामान्य सभासदांचे हित जोपासले पाहिजे.

शिक्षक समितीच्या सातव्या वर्धापनानिमित्त संस्थापक शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन सुकाणू समितीचे सर्व सदस्य व नूतन बँकेचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. नूतन चेअरमन अर्जुन पाटील व व्हाईस चेअरमन पद्मजा मेढे-पाटील यांचा सत्कार ज्योतिराम पाटील व रवी पाटील यांच्या हस्ते, तर हातकणंगले तालुका शिक्षक समितीच्या वतीने सर्व सुकाणू समिती व बँकेच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. बाजीराव पाटील, बाळासो पवार, रघु खोत, विलास चौगुले संजय कुंभार, मारुती पाटील, अनिल नलवडे, सागर पाटील सतीश जयकर, भगवान जंगम, भानुदास वसगडे, कृष्णात पाटील, माणिक कागवडे उपस्थित होते.