कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त स्वॅब टेस्ट केल्या जात आहेत. परंतु, कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वॅब तपासणी पथकाकडून स्वॅबसाठी सरसकट नागरिकांवर जबरदस्ती करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी तात्काळ स्वॅब तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारात सुधारणा कराव्यात. अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ई-मेल द्वारे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिल्या आहेत.

राजेश क्षीरसागर यांनी, प्रशासनाने स्वॅबसाठी दररोजचे दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी नागरिकांवर ही जबरदस्ती करण्यात येत आहे. आजारी आणि लक्षणे नसलेल्या नागरिकांचे जबरदस्ती स्वॅब घेणे, लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचेही स्वॅब घेणे, स्वॅब न देणाऱ्या नागरिकांना पोलीस कारवाईची धमकी देणे. असे प्रकार महानगरपालिका प्रशासना करीत आहे.  महानगरपालिका प्रशासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणावेळी गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. यामुळे काही केंद्रांवर वादावादीचे प्रकार घडत आहेत.

त्याचबरोबर प्रा. आरोग्य केंद्रात केलेल्या आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट तब्बल महिनाभराच्या विलंबाने प्राप्त होत असल्याने टेस्ट केलेल्या नागरिकांना एक महिन्याच्या अवधीनंतर संपर्क साधण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. अशा घटनांमुळे शहरवासियांना नाहक त्रास होत आहे. यासह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे सूचित करीत या बाबीकडे स्वत: गांभीर्याने लक्ष देवून स्वॅब तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारात त्वरित सुधारणा करण्याच्या संबधित पथकास आणि आरोग्य केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्याना आदेश द्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.