कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे बंद असलेली क्रीडांगणे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, तालमी योग्य ती काळजी घेवून सुरू करावीत. अन्यथा आंदोलन केले जाईल, अशा इशाऱ्याचे निवेदन कोल्हापूर शहर, जिल्हा नागरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कीडांगणे, जलतरण तलाव बंद करण्यात आले आहेत. सहा महिन्यांपासून हे बंद असल्याने खेळाडूंना सराव करणे अडचणीचे झाले असून त्यांची गैरसोय होत आहे. सराव नसल्याने विविध स्तरावरील स्पर्धेत कसे सहभागी व्हायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. आता सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे क्रीडांगणे, व्यायामशाळा सुरू करावेत अशी मागणी केली आहे.
यावेळी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, राजेश वरक, बाबासाहेब देवकर, विक्रांत पाटील, संभाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते.