कोल्हापूर (प्रतिनिधी) : हाथरस (उत्तर प्रदेश) येथील सामुहिक बलात्काराच्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. त्यात सरकारच्या दडपशाहीने तर देशाची मान शरमेने झुकली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी गुन्हेगारांच्या पुतळ्याला जाहीर फाशी देत उत्तरप्रदेश सरकार बरखास्तीची मागणी करण्यात आली.
हाथरस मधील एका मागासवर्गीय मुलीवर अमानुषपणे सामूहिक अत्याचार करण्यात आला. आरोपींना पकडणे तर दुरच, उलट हे प्रकरणच पोलीस बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न झाला. पीडितेचा मृतदेह परस्पर पोलिसांनी गुपचुप दहन केला. तिच्या कुटुंबियांना डांबून ठेऊन, राष्ट्रीय विरोधीपक्ष नेत्यांसह प्रसिद्धी माध्यमानाही भेटण्यास अटकाव करत, दडपशाही करण्यात आली.
बलात्काराच्या अशा वाढत्या घटना आणि अमानुषपणा करणा-या गुन्हेगारांना एकप्रकारे पाठीशी घालणा-या उत्तर प्रदेश येथील योगी सरकार विरोधात सर्वत्र संतापाची लाट पसरत आहे. एकापाठोपाठ अशा अनेक घटना घडु लागल्याने उत्तर प्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षिततेबाबत अपयशी ठरले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करावे, तसेच हाथरस येथील अमानुष बलात्कार करणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशीच द्या या मागणीसाठी आज जिल्हा शिवसेनेच्यावतीने आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक बिंदू चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी माजी आ. सुरेश साळोखे, शहरप्रमुख शिवाजी जाधव, अवधूत साळोखे, शशीकांत बीडकर, महिला आघाडीच्या शुभांगी पोवार, स्मिता सावंत, मेघणा पेडणेकर, दिनेश परमार, मंजीत माने आदी शिवसैनिक उपस्थित होते.