मुंबई/ प्रतनिधी : राज्य सहकारी बँकेच्या– शिखर बँक कथित घोटाळ्याप्रकरणी पवार घराण्याला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांना देखील क्लीन चिट मिळाली आहे. तर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पवार कुटुंबियांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला असून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या – शिखर बँकेत कोणताही घोटाळा झाला नसल्याचा या रिपोर्टमधून दावा करण्यात आला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी कथित संबंध असलेल्या व्यवहारांमध्ये कोणताही फौजदारी गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले आहे. बँकेला कोणताही आर्थिक नुकसान झालं नसून आत्ता पर्यंत 1343.41 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचे क्लोजर रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे.

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याचा निष्कर्ष आधीच काढल होता. त्यामुळे या कथित घोटाळा प्रकरणात त्यांना आधीच दिलासा मिळाला होता. तर जानेवारी महिन्यात या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. परंतु, त्यातील तपशीलाची माहिती आता उघड करण्यात आली आहे. ज्यामुळे या रिपोर्टमध्ये अजित पवारांशी संबंधित व्यवहारांमध्य कोणत्याही फौजदारी गुन्ह्याची नोंद नसल्याचेही सांगितले आहे.