मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जाणता राजा नव्हे, तर लुटारू नेते आहेत, अशी घणाघाती टीका भाजप नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज (शनिवार) येथे केली. एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी  परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखले. यावेळी खोत बोलत होते.

खोत म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार गांजा ओढत असून आंदोलकांशी    चर्चा करायला त्यांना वेळ नाही. शरद पवार म्हणतात संपावर मध्य मार्ग काढू, पण पवारांचा मध्य मार्ग नेमका कुठे आहे ? हे कधीच कळू शकलेले नाही. सत्तेसाठी  पवारसाहेब पावसात भिजले, पण काल एसटी कर्मचारी पावसात भिजले, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पवारांना दिसले नाहीत का ? परिवहन मंत्री अनिल परब यांना मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले आहे. याच्या निषेधार्थ त्यांना साडी-भेट देणार असल्याचे खोत यांनी सांगितले. दरम्यान, एसटी कर्मचार्‍यांच्या पाठीशी राहू आणि अनिल परब यांना जेलमध्ये घालू, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.