दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्समध्ये  एक हजार अंकांची घसरण दिसून आली, तर निफ्टी तब्बल २९८ अंकांची मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेत पुन्हा महागाई वाढल्याने अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली होती. महागाई वाढल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात प्री-ओपनिंग सत्रात घसरण झाल्यानंतर बाजार सावरू लागला. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,१५३.९६ अंकांनी म्हणजे जवळपास १.९१ टक्क्यांच्या घसरणीसह ५९.४१७ अंकांवर खुला झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २९८.९० अंकांनी म्हणजे १.५६ टक्क्यांच्या घसरणीसह १७,७७१ अंकावर खुला झाला. प्री-ओपनिंगनंतर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बाजार पुन्हा सावरू लागला. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ५६० अंकांच्या घसरणीसह ६०,००१.०५ अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी १५९ अंकांच्या घसरणीसह १७,९१०.८० अंकांवर व्यवहार करत होता.