मुंबई : शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीने झाली. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. त्याचा दबाव भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.

आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बीएसई निर्देशांक सेन्सेक्स ४०७.७३ अंकांच्या घसरणीसह ५८,७८९.२६ अंकावर खुला झाला. एनएसई निर्देशांक निफ्टीमध्ये १३६.२० अंकांच्या घसरणीसह १७,५१९.४० अंकांवर खुला झाला. सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स २८७ अंकांच्या घसरणीसह ५८,९०९.३६ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी निर्देशांक ८४ अंकांच्या घसरणीसह १७,५७१.३५ अंकांवर व्यवहार करत होता.

आज मीडिया, मेटल, फार्मा आणि ऑईल अँड गॅस सेक्टरमध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे. इतर सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे. सर्वाधिक घसरण बँकेच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे. आयटी सेक्टरमध्ये ०.६३ टक्क्यांची घसरण दिसत आहे. वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअरमध्ये ०.६ टक्क्यांची किंचित घसरण दिसून येत आहे. ऑटो शेअरमध्ये ०.४२ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी पाच कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी असल्याचे दिसून आले आहे. उर्वरित २५ शेअरच्या दरात घसरण असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय ५० पैकी ९ शेअरमध्ये तेजी असून, ३९ शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे.