कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून ‘शाळा बंद शिक्षण सुरु’ ही मोहिम कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण समितीने यशस्वीपणे  राबविली. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या कॉम्रेड गोविंद पानसरे विद्यालयात लर्न फ्रॉम होम या संकल्पनेवर भर देऊन शिक्षणाचा पाया घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीने लर्न फ्रॉम होम ही संकल्पना महापौर सौ. निलोफर आजरेकर  आणि आयुक्त डॉ. कल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण समितीचे सभापती  श्रावण फडतारे, उपसभापती व सदस्य यांच्या पुढाकाराने राबविली आहे.

लर्न फ्रॉम होम ही संकल्पना राबवण्यासाठी प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या आवाहनानुसार शिक्षकांनी स्वत: अभ्यासावर आधारित व्हिडीओ तयार करुन प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पेाहचण्याचा  प्रयत्न केला आहे. याकामी शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांनी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून, लर्न फ्रॉम होम या उपक्रमाबाबत माहितीपर प्रशिक्षण दिले. ऑनलाईन शिक्षण हे व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून सर्वच विद्यार्थ्यांना पाठ नियोजन करून दिले. कॉ. गोविंद पानसरे विदयालय क्र. ६७ राजोपाध्येनगर येथे या लॉकडाऊनच्या काळातही शिक्षणात खंड पडू दिला नाही.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आशालता कांजर यांनी लॉकडाऊन काळातही व्हर्च्युअल क्लासचे योग्य नियोजन करुन पालक, शिक्षक संपर्क वाढविण्यावर भर दिला. शाळेतील शिक्षक अजित कानकेकर, दिपाली कुंभार, सीमा रावळ, तानाजी दराडे, सुरेश केरुरे यांनी या काळात कोरोना योध्दा म्हणून कार्य केले. शिक्षक दिपक कुंभार, वर्षा मुरकुटे-पाटील यांनी शालेय कामकाजाबरोबर विद्यार्थी संपर्कावर भर दिला. शाळा परिसर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सेवक लक्ष्मण पोवार सतत प्रयत्न केले.

शिक्षकांनी वर्गनिहाय व्हॉटस अँप ग्रुप स्थापन करुन सुचना तसेच अभ्यासक्रम घेतला. कोरोनाच्या पार्श्वभमीवर पालकांशी संवाद साधून घरी घ्यावयाची दक्षता यासंबंधी चर्चा केली. या काळात मुलांचे आधारकार्ड लिंक करण्याचे कामही पूर्ण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी व शिक्षकदिनी मुलांच्या निबंध, वक्तृत्व, चित्रकलेच्या ऑनलाईन स्पर्धा घेतल्या. तसेच मोबाईलवर दररोज अभ्यास दिला जातो. मुले तो अभ्यास करुन त्यांचे फोटो शिक्षकांना पाठवतात. यामुळे शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया योग्य प्रकारे पार पडली.

याबरोरच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यामध्ये तसेच सद्या सुरु असलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेतही शिक्षकांनी सक्रीय सहभाग घेतला. या उपक्रमासाठी प्रभागाच्या नगरसेविका सौ.मनिषा कुंभार तसेच व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. पद्मजा चित्रकार त्यांनीही लर्न फ्रॉम होम ही संकल्पना यशस्वी करण्यास मोलाची मदत व मार्गदर्शन केले.