कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन या संस्थेला ३१ ऑक्टोबर २०२० रोजी ६१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करुन कौटुंबिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये सभासदांना भेटवस्तूंचे वाटप करून पुढील वर्षाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष संजीव देवरुखकर आणि उपाध्यक्ष संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनची स्थापना ३१ ऑक्टोबर १९५९ रोजी करण्यात आली आहे. त्यावेळी संस्थेचे ३५ सभासद होते. सध्या संस्थेचे ४०० हून अधिक सभासद झाले असून संस्थेच्या वतीने वर्षभरात ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सत्कार, स्पर्धा, प्रदर्शन, व्याख्यान, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. तसेच महापूर आणि कोरोना काळात नुकसानग्रस्त झालेल्या गरजू सभासदांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली आहे. यंदा फोटोग्राफर संस्थेला ६१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे एकसष्ठी निमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे नियोजन होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रोजी शासनाच्या नियमांचे पालन करत मोजक्याच पदाधिकारी, सभासदांच्या उपस्थितीत कौटुंबिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

यावेळी फोटोग्राफर असोसिएशनचे कार्यवाह किशोर पालोजी संचालक महेश बागे, प्रसाद बेंद्रे, जयदेव बोरपालकर, देवदत्त आंबले, प्रकाश क्षीरसागर, सुनील जाधव, राजवर्धन मोरे, कृष्णा शेटे आदी उपस्थित होते.