कोल्हापूर  (प्रतिनिधी):  करवीर निवासिनी श्री अंबाबाईला भाविकांकडून अर्पण केलेल्या प्रसाद साड्या देवस्थान समितीकडे उपलब्ध आहेत. या साड्यांची टेंबलाईवाडी येथील श्री. त्र्यंबोली देवस्थान,  देवस्थान व्यवस्थापन समिती हॉल  येथे  शनिवारपासून  (दि.११) विक्री केली जाणार आहे.  तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे  आवाहन सचिव शिवराज नाईकवडे यांनी केले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुनच साड्यांची विक्री होणार आहे. प्रसाद साडी विक्री सकाळ सत्रामध्ये सकाळी ८  ते ११ साठी १०० कुपन व दुपार सत्रामध्ये दु. २ ते ५  साठी १०० कूपन देण्यात येतील. त्यानुसार प्रथम येणाऱ्यांना प्रथम साडी दिली जाईल. जे भाविक प्रसाद साडी खरेदीसाठी येणार आहेत. त्या भाविकांना कुपन देण्यात येणार  आहेत.

साड्यांवर जे देणगी मूल्य असेल त्याच्या ६० टक्के रक्कम आकारणी करून ती देवस्थान समितीकडे जमा केल्यानंतर पावती दिली जाईल. प्रत्येक भाविकाला जास्तीत जास्त ५ साड्या घेता येतील. त्यासाठी भाविकांनी आधारकार्डाची छायांकित प्रत घेऊन यावे. त्यावर आपला भ्रमणध्वनी,  दूरध्वनी क्रमांक नमुद करावा. प्रसाद साडीची घडी न उघडता जशी आहे तशीच घेता येईल. भाविकांमार्फत खरेदी केलेली प्रसाद साडी कोणत्याही कारणास्तव बदलून दिली जाणार नाही,  असेही समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.