नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढच होत आहे. सोमवारीही तेल कंपन्यांनी आणि डिझेलचे दर अनुक्रमे २८ आणि २९ पैसे प्रतिलिटर वाढविले आहेत. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर पुन्हा एकदा नव्वदी पार गेले आहेत. पेट्रोलचे दर ९० पार केल्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या एका नेत्याने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे. “देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करा” असं काँग्रेस नेते श्रीवत्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. “पेट्रोल दर : ९० रुपये, वास्तव किंमत : ३० रुपये, मोदी टॅक्स : ६० रुपये असं म्हणत देशातील सर्व पेट्रोल पंपांची नाव बदलून ‘नरेंद्र मोदी वसुली केंद्र’ करण्यात यावं” असे श्रीवत्स यांनी म्हटले आहे.