कोल्हापूर ( प्रतिनिधी ) काँग्रेसमध्ये काम केलेल्या 28 वर्षाचं चिज झालं नाही असं म्हणत कोल्हापूर लोकसभेसाठी मैदानात उतरलेले बाजीराव खाडे यांच्यावर राष्ट्रीय काँग्रेसने आज कारवाई करत पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच आज निर्णय स्पष्ट केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांचे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतचे निर्देश उपाध्यक्ष नाना गावंडे यांना दिले आहेत. यानंतर खाडेंवर आज कारवाई करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी या भुमिकेबाबत बोलताना खाडे यांनी म्हटले होते की, पक्षाने आमच्या निष्ठेचा किमान विचार करायला हवा होता. मात्र आम्हाला न विचारल्याने आम्ही ही भूमिका घेत असल्याचं खाडे यांनी म्हटले होते. तसेच काही स्थानिक नेत्यांनी मनधरणी केली असली तरी आमच्या निष्ठेला काही मोल नसल्याचं ही त्यांनी निराशेतून म्हटलं होतं. याबाबत लाईव्ह मराठीने बाजीराव खाडे यांच्याशी संपर्क साधला असता येत्या काही तासात याबाबत आपण खुलासा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.