गारगोटी (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्यास स्थगिती दिल्यानंतर समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. भुदरगड तालुक्यातील गावागावातून आंदोलन होत आहे. त्यातच राज्य शासन नोकरभरती करत असून ती थांबवावी या मागणीसाठी तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने (दि.२८) सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता गारगोटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच मराठा आरक्षण बचाव संघर्ष यात्रा काढण्याचा आणि आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

आज गारगोटी येथील शाहू वाचनालय येथे सकल मराठा समाजाची बैठक झाली. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्य शासनाने कोणतीही नोकर भरती करू नये, तसेच मराठा आरक्षण बचाव संघर्ष यात्रा काढणेत येणार आहे. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या क्षात्र जगद्गुरू मौनी मठ पाटगाव तसेच छत्रपती शिवरायांचे गुरू श्री मौनी महाराज समाधीस्थळ पाटगाव ते संत बाळूमामा समाधीस्थळ आदमापूर अशी ही संघर्ष यात्रा निघणार आहे.

या मार्गावरील सर्व गावांतून या यात्रेचे स्वागत करणे, जनजागृती करण्यासाठी ज्या-त्या भागातील आजी माजी जि प सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी जबाबदारी पार पाडावी असे ठरवण्यात आले. याबरोबरच मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. नोकर भरती करू नये या मागणीचे निवेदन भुदरगड तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे, राहुल देसाई, प्रा. अर्जुन आबिटकर, प्रविणसिह सावंत, नाथाजी पाटील, जयवंत गोरे, सचिन भांदिगरे, डॉ सुभाष देसाई, गारगोटी सरपंच संदेश भोपळे, बाबा नांदेकर, विश्वजित जाधव, माजी उपसरपंच सचिन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.