हातकणंगले (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिरोळ येथील आपल्या निवस्थानी तीन दिवस अलगीकरण झाले आहेत. नुकतेच ते पंढरपूरहून भगीरथ भालके यांच्या प्रचारातून घरी परतले. त्यांच्यासोबत असणारे सहकारी कोरोनाग्रस्त असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ३ दिवस घरी थांबण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान गोकुळबाबत शेट्टी दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोकुळ निवडणुकीविषयी त्यांना विचारले असता, दोन्ही आघाडीचे नेते फोनवर संपर्कात असून आपल्या घरी येऊन भेटून ही गेले असल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळमध्ये कोणाच्या बाजूने राहायचे ह्या बाबत निर्णय घेतला नाही. दोन दिवसानंतर प्रमुख कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. रयत क्रांती संघटनेचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार, शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे आपल्या इस्लामपूर येथील निवास्थानी आहेत. गोकुळ निवडणुकीच्या संदर्भात विचारले असता निवडणुकीत सत्तारूढ आघाडीला आपला पाठिंबा आहे. कोरोनामुळे आपण प्रत्यक्षात मैदानात उतरून भाग घेऊ शकलो नसलो तरी सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी बोलावलं तर उघड त्यांचा प्रचार करू अशी भूमिका सदाभाऊ खोत यांनी घेतली आहे.

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेला दूध संघाच्या निवडणुकीत कमालीचे महत्त्व आहे. दूध दर वाढीसाठी आंदोलन करून या नेत्यांनी दूध उत्पादकांना न्याय दिला होता. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत ते कशी भूमिका वाटवतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.