मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. सर्वच पक्षांकडून प्रचाराकहा झंजावात सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून आपापल्या उमेदवारासाठी पक्षीय नेत्यांच्या सभा घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या सभा सुरु असून आता कॉंग्रेसकडून महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या दोन सभा होणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा होणार असून एका सभा सोलापूर तर दुसरी सभा अमरावती येथे होणार आहे. यामध्ये सोलापूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची बुधवारी दुपारी तीन वाजता येथील एक्झिबिशन मैदान, मरी आई चौक येथे सभा होणार आहे. तर विद्यमान आमदार असलेल्या प्रणिती शिंदेंच्या विरोधात भाजपने माळशिरसचे आमदार राम सातपूते यांना मैदानात उतरवले आहे. दोन्ही उमेदवार प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. येथे 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर अमरावती लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अमरावतीमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, काँग्रेस नेते राहुल गांधींची या दोन मतदारसंघात सभा होणार आहे. सोलापूरसह राहुल गांधी अमरावतीमध्येही जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तिथे काँग्रेसचे बळवंत वानखेडे उमेदवार आहेत.