कोतोली (प्रतिनिधी) :  पुनाळ-तिरपण (ता. पन्हाळा) दरम्यान असणाऱ्या कासारी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची लोखंडी दारे बसवण्याचे पुनाळ-तिरपण कासारी नदी सहकारी धरण संस्थेमार्फत सुरु आहे. परिसरातील चौदा गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या या धरण संस्थेमार्फत या बंधाऱ्यांची डागडुजी व देखभाल केली जाते. पुराच्या पाण्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून पाणी साठवण्यासाठी लावण्यात आलेली दारे काढण्यात येतात.

सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्यात परत दारे घातली जातात. पुराच्या पाण्याने बंधाऱ्यांचे काही नुकसान झाले असेल तर त्याची लगेच डागडुजी केली जाते. वेळोवेळी करण्यात येत असलेल्या डागडुजी व दुरुस्तीमुळे १९५३ साली कै. वासुदेव विष्णू कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्नातून बांधलेला हा बंधारा अजूनही मजबूत स्थितीत आहे.

पुनाळ-तिरपण कासारी नदी धरण संस्थेचे चेअरमन मारुती पाटील, व्हा. चेअरमन नारायण येरुडकर, सचिव दगडू गुरव, सर्व संचालक व कर्मचारी यांचे या बंधाऱ्याच्या डागडुजीवर विशेष लक्ष असते. या बंधाऱ्यात डवण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याची योग्य सोय व सिंचनाची चांगली व्यवस्था होत असल्याने परिसरातील शेतीकरी समाधानी आहेत.