कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याची काजळी आणि विषारी दूषित पाण्यामुळे कागल शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी समरजित घाटगे यांची इच्छा असेल, तर त्यांना भेटून चर्चेची तयारी आहे. ही काजळी आणि दूषित पाणी थांबले नाही, तर मात्र लोकप्रतिनिधी म्हणून मला आंदोलनच उभारावे लागेल, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

येथील प्रभाग क्रमांक दोनमधील श्रीमंत जयसिंगराव घाटगे पार्क, श्रमिक वसाहत, आधार कॉलनी, समर्थ कॉलनी या वसाहतींमध्ये चार कोटी रुपये निधीतून करावयाच्या सैनिक भवन, नक्षत्र गार्डन व कंपाऊंड, रस्ते, गटारी या कामांचा प्रारंभ आ. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

ते म्हणाले, आमचाही साखर कारखाना आहे. त्यातील अडचणींचीही मला जाणीव आहे; परंतु या प्रश्नावर पैसे खर्च करून तो सोडवण्यासाठी त्यांनी किमान प्रयत्न तरी करायला हवेत. शाहू कारखान्याच्या बॉयलरमधून पडणाऱ्या काजळीमुळे श्रीमंत जयसिंगराव घाटगे पार्क, श्रमिक वसाहत, यशिला पार्क, वडवाडी, अनंत रोटो परिसरासह शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. कागल शहराला पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व्हावा म्हणून काळमवाडी धरणातून ६५ किलोमीटर कालव्यातून पाणी थेट कागलच्या जयसिंगराव घाटगे तलावात आणले आहे; परंतु शाहू कारखान्यामधून बाहेर पडणारे दूषित पाणी कालव्याच्या बाजूला सोडले जाते. यामुळे हे पाणीही दूषित होण्याचा मोठा धोका आहे.

माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, समरजित घाटगे यांनी काहीही काम न करता खोटं आणि मोठं बोलण्याचा सपाटाच लावलेला आहे. केडीसीसीची संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, गेल्या पंचवार्षिकमध्ये राज्यात भाजपचे सरकार होते. समरजित घाटगे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा होता. त्यांनी कागलसाठी एकही पैसा आणला नाही. उलट आ मुश्रीफांनी आणलेला निधी परतवून घालवण्यात धन्यता मानत आहेत. आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कर्नल विलासराव सुळकुडे म्हणाले, मुश्रीफ यांनी सैनिकांच्या संघटित कार्यासाठी कागल शहरात सैनिक भावनासाठी सत्तर लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

संग्राम गुरव म्हणाले, भाजपची राजवट असताना समरजित घाटगे कागलला निधी आणतील, प्रश्न सुटतील अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. शहरात भाजपचे चार नगरसेवक निवडून आले होते. त्या चौघांनीही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. विरोधी नेतृत्वाने याचे आत्मचिंतन करावे. राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद नितीन दिंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष नवल बोते, गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ, प्रकाश नाळे, सतीश घाटगे, प्रवीण काळबर, वसंतराव शृंगारे, पांडुरंग पोटे, संजीव ठोंबरे, साहेबलाल पिंजारी, अस्लम मकानदार, अण्णा केर्ले, फिरोज कडगी, नागेश चौगुले, नामदेव मगर, श्रीकांत देवर्षी, आप्पासाहेब जकाते, दिलीप शिंदे, महिला शहर उपाध्यक्ष रहिमा लियाकत-मकानदार, निशांत जाधव, चंद्रवदन भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.