मणिपूर ( वृत्तसंस्था ) मणिपूरमध्ये मोरे येथील पोलीस अधिकारी चिंगथम आनंद कुमार यांच्या हत्येनंतर स्थानिकांमध्ये संताप वाढला आहे. त्यामुळे आसाम रायफल्सच्या 200 हून अधिक सैनिकांना जातीय संघर्षग्रस्त मणिपूरमधील मोरेह येथे विमानाने पाठवण्यात आले आहे. तसेच काही सैन्य मोरेहमध्ये ( भारत-म्यानमार सीमा ) लपून बसलेले दहशतवादी ओळखण्यात गुंतले आहे.

वृत्त वाहिन्यांना वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आसाम रायफल्स दहशतवादविरोधी कारवायांमध्ये इतर एजन्सीसोबत काम करत आहे. ज्यांनी पोलीस कर्मचार्‍यांची हत्या केली आणि इतरांना जखमी केले त्यांची ओळख पटली असल्याचे सांगण्यात येत आहे.

इम्फाळपासून 110 किमी अंतरावर सीमेवर असलेल्या मोरेहमध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी दोन वेगवेगळे हल्ले केले होते. त्यापैकी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) मोरेह, चिंगथम आनंद कुमार यांचा मृत्यू झाला आणि सुदृढीकरण दलाचे तीन हवालदार गोळ्यांनी जखमी झाले.

खुनासाठी स्नायपरचा वापर

संपूर्ण मणिपूरमध्ये अनेक सुरक्षा दलं तैनात करण्यात आली आहेत. मणिपूरमध्ये 3 मे पासून जातीय हिंसाचार सुरू आहे. विशेषतः आसाम रायफल्सचे गुप्तचर अधिकारी कुकीचे वर्चस्व असलेल्या तेंगनौपल जिल्ह्यातील मोरेहमध्ये गुंतलेले आहेत.

मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनी सांगितले की, म्यानमार सीमेवरील मोरेह येथे एका उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या (SDPO) हत्येमध्ये स्निपर असलेल्या एका गटाचा हात होता. त्यांची ओळख पटली असून आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की प्राणघातक हल्ला हे पीपल्स प्रोटेक्शन फोर्स (PPF) नावाच्या नव्याने स्थापन झालेल्या गटाचे काम होते.