नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. ३० जून रोजी मोदींची एकूण संपत्ती २.८५ कोटी रुपये झाली आहे. २०१९ च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत यंदा तब्बल ३६ लाखांनी वाढ झाली आहे. त्यांनी कोणतेही कर्ज घेतलेले नाही. त्यांच्या नावावर एकही गाडी किंवा इतर वाहन नाही. ४५ ग्रॅम सोन्याच्या ४ अंगठ्या आहेत.
मागच्या वर्षी पंतप्रधान मोदी यांची संपत्ती २.४९ कोटी रुपये होती. अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आणि शेअर बाजारातही चढ-उतार असताना मोदींची संपत्ती कशी वाढली, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. पण त्यांची संपत्ती बँका आणि अनेक इतर सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक केल्याने वाढली आहे. बँकांमधून त्यांना तब्बल ३.३ लाख परतावा मिळाला आहे. तर इतर साधनांमधून ३३ लाख रुपये मिळाले आहेत.
यंदाच्या जून महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान मोदी यांच्याकडे रोख रक्कम फक्त ३१,४५० रुपये होती. त्यांनी डाक विभागात नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट मध्ये तब्बल ८४, १२४ रुपये जमा केले आहेत. जीवन विमा पॉलिसीमध्ये १,५०,९५७ रुपये आणि टॅक्स सेव्हिंग्ज इन्फ्रा बॉन्डमध्ये २, ००० रुपये लावले आहेत. अशा प्रकारे त्यांची एकूण जंगम मालमत्ता १. ७५ कोटी रुपये आहे.
मोदींकडे संयुक्त मालकीचा गुजरातमध्ये ३५३१ चौरस फुटांचा एक प्लॉट आहे. हा प्लॉट चौघांच्या नावावर असून उर्वरित तिघांची २५-२५ टक्के भागीदारी आहे. ही मालमत्ता २५ ऑक्टोबर २००२ ला खरेदी करण्यात आली होती. गुजरातचे मुख्यमंत्री होण्याआधी दोन महिने याची किंमत फक्त १.३ लाख रुपये होती. पण आता मोदींच्या एकूण स्थावर संपत्तीची किंमत १.१० कोटींवर गेली आहे.