मुंबई ( वृत्तसंस्था ) जर तुमच्याकडे कार किंवा बाईक असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गेल्या दीड वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, मात्र आता याबाबतची चिन्हे दिसू लागली आहेत. सरकारी तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की, त्यांना डिझेलवर प्रतिलिटर 3 रुपये तोटा होत आहे, तर पेट्रोलवरील नफाही कमी झाला आहे.

पेट्रोलियम क्षेत्रातील उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की, पेट्रोलवरील नफ्यात घट आणि डिझेलवरील तोटा यामुळे पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्या किरकोळ किंमती कमी करण्याचे टाळत आहेत. दुसरीकडे, एप्रिल 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

देशातील 90 टक्के तेल बाजार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या सरकारी कंपन्यांद्वारे नियंत्रित आहे. क्रूडच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या तरी या कंपन्यांनी तेलाच्या किरकोळ किमतींमध्ये बराच काळ कोणताही बदल केला नाही.

भारत 85 टक्के तेल आयातीवर अवलंबून..!

तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे. साहजिकच जागतिक बाजारात क्रूडच्या किमतीचा परिणाम भारतीय बाजारावरही होतो. तेल उद्योगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘डिझेलवर तोटा होत आहे, जो आता प्रति लिटर 3 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. याशिवाय, पेट्रोलवरील नफ्याचे मार्जिनही 3-4 रुपये प्रति लिटरपर्यंत कमी झाले आहे, जे काही काळापर्यंत 8 ते 10 रुपये प्रति लिटर होते.