धामोड (सतीश जाधव) : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट होत आहे. असे असले तरीही निष्काळजीपणा करून चालणार नाही. याचमुळे यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.

याचाच एक भाग म्हणून, राधानगरी तालुक्यातील तुळशी परीसरातील तळगाव-महालक्ष्मी, आपटाळ-भावेश्वरी, केळोशी बुद्रुक-रासाई, बुरंबाळी (देऊळवाडी)-भराडी, केळोशी खुर्द-जोतिबा, धामोड-भानोबा, कोते-आंबाबाई, चांदे-जोतिबा ही प्रमुख गावे आणि त्याअंतर्गत येणाऱ्या वाड्यांची ग्रामदैवत आहेत. या सर्व देवळात दरवर्षी दसरा, नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बाहेरील गावातून येणारे भाविक आणि देवळात होणारी गर्दी यामुळे आणखी संसर्ग वाढू नये, यासाठी देवळात भाविकांना प्रवेश बंद केला असून देवतांची पूजा आणि इतर विधी परंपरेप्रमाणे करून साध्या पध्दतीने दसरा आणि नवरात्र उत्सव करण्याचा निर्णय कोरोना दक्षता कमिटी, ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी यांनी घेतला आहे.