कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाटबंधारे विभागाने कामाच्या नियोजनाचा आगामी तीन वर्षासाठीचा विस्तृत आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. आज (शनिवार) सिंचन भवनात झालेल्या कुंभी, कासारी आणि कडवी या प्रकल्पाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता कामाचे योग्य नियोजन करा, या विभागाची बदनामी होऊ देऊ नका अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी, पाटबंधारे विभागाने पाच वर्षात कोणकोणती कामे केली आहेत, त्यासाठी किती निधी खर्च केला याची माहिती द्या. प्राधान्याने कोणती कामे करावी लागणार आहेत यासंबंधी तीन वर्षांसाठीचा विस्तृत आराखडा तयार करावा, असे निर्देश दिले.

बळपवाडी, राई-कंदलगाव आणि गारिवडे या तिन्ही बंधाऱ्यांचा आराखडा अंतिम टप्प्यात असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने ही काम मार्गी लावण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी दिले. तसेच धामणी प्रकल्पासाठी या वर्षी ४० कोटींच्या निधीची तरतूद केली होती. मात्र कोरोनामुळे केवळ तेरा कोटींचा निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी आणि पाटबंधारे विभागाकडे सिंचनाखाली असलेल्या क्षेत्राची आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याने या दोन्ही विभागांनी एकत्रितरित्या जिल्ह्यातील मोजणी करून घ्यावी, असंही पालकमंत्री पाटील यांनी सुचवले. कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी, गेल्या आर्थिक वर्षात सिंचनातून जवळपास पाच कोटींची वसुली तर बिगर सिंचनातून जवळपास २५ कोटींचा महसूल जमा झाल्याची माहिती दिली.

या बैठकीला जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील, जि. प. सदस्य भगवान पाटील, कार्यकारी अभियंता ए. ए. नाईक, कार्य. अभियंता एस. आर. पाटील, कार्य. अभियंता डी. डी. शिंदे, स्मिता माने आदी उपस्थित होते.