कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत १३ लाख ३० हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून जिल्ह्यामध्ये लस वाया जाण्याचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

लसीकरणाबाबत ना. पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात ३० जूनपर्यंत एकूण १३ लाख ३० हजार २२६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये ४५ वर्षावरील ८ लाख ८२ हजार २४५ नागरिकांना पहिला डोस तर २ लाख १५ हजार ६२० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात ४५ वर्षे व त्यावरील लाभार्थ्यांची अपेक्षित लोकसंख्या १२.७४ लक्ष आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसचे एकूण १०.९८ लोकांचे लसीकरण झालेले आहे. कोल्हापूर जिल्हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहे. कोविन पोर्टलवरील अहवालानुसार कोल्हापूर जिल्ह्यात लस वाया जाण्याचे प्रमाण उणे ०.७३ इतके अल्प असल्याचे निदर्शनास आले आहे.