कोल्हापूर (प्रतिनिधी) : अमर रहे…अमर रहे… संग्राम पाटील अमर रहे… अशा घोषणा… पाकिस्तानविरोधी घोषणा.. कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा… नागरिकांच्या चेहऱ्यावरील दु:खाची छाया… अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीतून आलेले नागरिक… शासकीय मानवंदना अशा शोककुल वातावरणात शहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान संग्राम पाटील यांना वीरमरण आले.   करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथे सकाळी त्यांचे पार्थिव आणण्यात आले.  त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील,  खासदार संजय मंडलिक,  आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे सीईओ अमल मित्तल, माजी आमदार अमल महाडिक आदी उपस्थित होते.

श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते वीर जवान संग्राम पाटील यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना दिली. संग्राम पाटील यांच्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा काढून गावातील शाळेच्या मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नागरिकांनी रस्त्याची दुतर्फा मोठी गर्दी केली होती. तरूण, महिला, लहान मुलेही अंत्ययात्रेत सामील झाली होती. यावेळी भारत माता की जय, संग्राम पाटील अमरे रहे, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी आसंमत दणाणून केला होता.