राधानगरी ( प्रतिनिधी ) राधानगरी तालुक्यातील केळोशी पैकी माळवाडी येथील नवविवाहिता सविता दत्तात्रय शिंदे वय 24 वर्षे हिने सासरच्या जाचाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे विवाहितेचा जाच करणाऱ्या पती,सासू,सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार पिडीत विवाहितेचा तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दरम्यान तीचा जाच सुरु होता. याला कंटाळून आत्महत्या करावी लागल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. त्यामुळे आत्महतेस प्रवृत्त करणारे पती,सासू,सासरे यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि निष्पाप मुलीला न्याय द्यावा अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात ठाण मांडत केली आहे.


सविता शिंदे हिला पती,सासूसासऱ्याकडून सततचा जाच होत होता.तिला दीड वर्षांची लहान मुलगी आहे.जाचाला कंटाळून ती चार महिन्यांपूर्वी चक्रेश्वरवाडी गावी माहेरी आली होती. स्थानिक पंच आणि नातेवाईकांनी वाद मिटवत मुलीला सासरी पाठवलं होतं. तरीही जाच सुरूच ठेवल्याने नवविवाहितेनं जाचाला कंटाळून अखेर मंगळवारी सकाळी विषारी औषध प्राशन केलं. तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं.


मात्र उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने पिडीतेला एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं.पण मंगळवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. आज बुधवारी पहाटे तिच्या सासरी केळोशी पैकी माळवाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संतप्त नातेवाईकांनी राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलीची कैफियत मांडत मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणारे पती,सासूसासऱ्यावर गुन्हा नोंद करून न्याय देण्याची मागणी केली.