कोल्हापूर (प्रतिनधी) : महापालिकेचा प्रत्येक विभाग हा स्वयंपूर्ण असला पाहिजे. कोल्हापूर शहरातील नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रशासन गतिमान होणे गरजेचे आहे. प्रशासकीय कामकाज कार्यक्षम करण्यासाठी तसेच कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने महापालिकेने आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले.

महापालिकेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. आमदार जाधव म्हणाल्या, कोल्हापुरात २०१९ व २०२१ मध्ये महापुराने हाहाकार उडाला होता. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहणे गरजेचे आहे. पूर्व नियोजन असेल तरच प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व नागरिकांची तारांबळ टाळता येणे शक्य आहे.

कोल्हापूर शहरात डेंगीसदृश रुग्णसंख्या वाढत असल्याने येत्या आठ दिवसांत शहर स्वच्छ झाले पाहिजे. प्रत्येक पाच प्रभागांत एक समन्वयक नेमून त्यांच्याकडून स्वच्छतेचा आढावा घ्यावा. पावसाळ्यात कुठेही कचरा साठून राहिला नाही पाहिजे. सर्व प्रभागांत औषध फवारणी करा. शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयाची जेटने सफाई करून औषध फवारणी करा, अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या.

संभाव्य पूर परिस्थितीमध्ये करावयाच्या कामाबाबत अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करून, चारही विभागीय कार्यालयात सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल, वैद्यकीय विभाग अद्ययावत ठेवा पूरपरिस्थितीत लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊ नये, वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आताच नियोजन करावे, अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या. महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली.

महापालिकेला आयएसओ मानांकन घेण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा वापर करावा, याचे वेळापत्रक निश्चित करा. यासाठी खासगी सल्लागारांची मदत घेण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठी जाधव इंडस्ट्रीज सर्वतोपरी सहकार्य करेल, असा शब्द उद्योजक सत्यजित जाधव यांनी दिला.

उपायुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, संदीप घारगे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, अग्निशमन दलप्रमुख तानाजी कवाळे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, लेखापाल संजय सरनाईक आदी उपस्थित होते.