कोलकत्ता ( वृत्तसंस्था ) 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. सत्ताधारी पक्षापासून ते विरोधी पक्षांपर्यंत आणि देशातील विविध जगातील दिग्गजांपर्यंत सर्व बड्या नेत्यांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यात तृणमूल काँग्रेसचा ही सहभाग आहे. मात्र या कार्यक्रमाकडे तृणमूल काँग्रेस पाठ फिरवणार असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रित केले आहे. मात्र त्या या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची चर्चा आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आणि ट्रस्टचे पदसिद्ध सदस्य नृपेंद्र मिश्रा, RSS चे अखिल भारतीय संपर्क प्रमुख राम लाल आणि VHP चे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे.

नृपेंद्र मिश्रा यांनीही मनमोहन सिंग यांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता पण माजी पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या नाजूक प्रकृतीचे कारण देत वेळ देण्यास नकार दिला. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

या समारंभासाठी पाहुण्यांची यादी काळजीपूर्वक तयार करण्यात आली आहे. यामध्ये उद्योगपती, शास्त्रज्ञ, अभिनेते, लष्करी अधिकारी आणि पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते यांचा समावेश आहे. पाहुण्यांच्या यादीत तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा, योगगुरू बाबा रामदेव यांना ही निमंत्रित करण्यात आले आहे.