कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी पुरेशी औषधांची आणि अनुषांगिक साहित्याची उपलब्धी करुन ठेवण्याचे आदेश महिला बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे यांनी आज दिले. त्या आज (मंगळवार) महिला व बालकल्याण समितीच्या सभेवेळी बोलत होत्या.
शोभा कवाळे म्हणाल्या की, महापालिकेची पंचगंगा आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ही शहर आणि जिल्हयातील जनतेची श्रध्दास्थाने असून लोकांच्या मनात या हॉस्पिटलबाबत विश्वासार्हता आहे. या दोन्ही हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी आवश्यक असणारी औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे आणि साहित्य तात्काळ उपलब्ध करुन द्यावे. रुग्णांवर कोणत्याही प्रकारचा बोजा पडता कामा नये, याबाबत कसलाही हलगर्जीपण होता कामा नये, अशी सूचनाही त्यांनी दिल्या.
याबाबत स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी या दोन्ही हॉस्पिटलना लागणारी औषधे आणि साहित्य येत्या दोन दिवसात उपलब्ध करण्याचे निर्देशही दिले. तसेच या दोन्ही हॉस्पिटलमधील रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर जेवण उपलब्ध करुन द्यावे, जेवणाच्या दर्ज्यामध्ये कसल्याही प्रकारची हायगय सहन केली जाणार नाही, असा इशाराही कवाळे यांनी दिला.