कोल्हापूर (प्रतिनिधी) : मिनी लॉकडाऊन अंतर्गत देवस्थान समितीच्या अखत्यारीत असलेली सर्व मंदिरे ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देऊ नये. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासनाने मिनी लॉकडाऊन पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई मंदिरातील कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड, स्वच्छता कर्मचारी, श्री पूजक आणि पोलीस अधिकारी यांची आज (मंगळवार) अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप येथे बैठक पार पडली. या बैठकीत जाधव बोलत होते.

या वेळी मंदिरात सर्व खबरदारी घेऊन कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले. तर मागील लॉकडाऊनमधील सर्वांचे केलेले सहकार्य आणि अनुभव लक्षात घेऊन या वेळेस आपण नियमांचे काटेकोर पालन करावे. या वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी ड्रेस वापरणे तसेच ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लस पुढील दोन दिवसात देण्यासंदर्भात उपायुक्तांशी चर्चा केली आहे. मिनी लाॅकडाऊन कालावधीत नित्यनेमाने होणाऱ्या पूजाअर्चा सुरू राहतील. गुढीपाडवा, रथोत्सव प्रातिनिधिक स्वरूपात संपन्न होतील, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

या बैठकीला सदस्य राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, जुना राजवाडा ठाण्याच्या उपनिरीक्षक नांद्रेकर मँडम, व्यवस्थापक धनाजी जाधव, श्रीपूजक प्रतिनिधी माधव मुनिश्वर आणि श्रीपूजक, कर्मचारी उपस्थित होते.