कोल्हापूर/प्रतिनिधी :  महायुतीचा कोल्हापूर आणि सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी या दोन्ही जागांविषयी सुतोवाच केल्याने. महाविकास आघाडी  हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार हे निश्चित झाले आहे. एकीकडे राजू शेट्टी यांचे महाविकास आघाडीचा पाठींबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे जयंत पाटील यांनी उमेदवार देण्याची भाषा केल्याने शेट्टी यांची महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिसकटल्याचं दिसतंय.

महाविकास आघाडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात  उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे सूतोवाच केले आहेत. राजू शेट्टी यांनी पाठिंबा घेतला नाही तर आम्हाला उमेदवार द्यावा लागेल, असं जयंत पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते. 

यावेळी जयंत पाटील यांनी भाजपच्या 45 प्लस नाऱ्याची खिल्ली उडवली. एक जागा तर कोल्हापूर मध्येच कमी होईल दुसरी साताऱ्यात होईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला. कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज तर साताऱ्यात अजून उमेदवार ठरलेला नाही.

सांगलीत शिवसेनेने उमेदवार घोषित केला आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उतरवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र त्याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. सांगलीची जागा काँग्रेसची असल्याची भावना वेळोवेळी काँग्रेस नेत्यांनी बोलून दाखवली आहे. मात्र यात आणखी काही मार्ग निघतो का याचे प्रयत्न सुरू आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. 

राजू शेट्टी दोनवेळा ‘मातोश्री’वर
शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे या मतदारसंघातून खासदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना या मतदारसंघात उमदेवार देण्यासाठी उत्सुक आहेत. पण इथे उमेदवार न देता आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यासाठी राजू शेट्टी यांनी दोन वेळा मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?
उद्धव ठाकरे हे पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत असा दावा राजू शेट्टी यांनी त्यांच्या भेटीनंतर केला होता. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार दिला तर हातकणंगले मतदारसंघात तिरंगी लढत निश्चित आहे. पण उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार याबाबत अद्याप उत्सुकता कायम आहे.