मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करतानाच महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नवा कायदा तयार करण्याचे संकेत दिले आहेत.शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्र्यांची समिती गठीत केली जाणार आहे.तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली नाही तर त्यांच्यावर खटला दाखल करण्याची तरतूद करण्यात येणार आहे, असे थोरात यांनी आज स्पष्ट केले.

महसूलमंत्री म्हणाले की, केंद्राने पास केलेला कृषी कायदा शेतकरी विरोधी आहे.त्याला विरोध म्हणून २ कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात येणार आहे. सोनिया गांधी हे निवेदन राष्ट्रपतींना देणार आहेत. या २ कोटी सह्यांपैकी एकट्या महाराष्ट्रातूनच ६० लाख सह्या झाल्या आहेत.आम्ही आधी शेतकऱ्यांना केंद्राचा कायदा समजावून सांगितला.त्यानंतरच त्यांच्या सह्या घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.