टोप (प्रतिनिधी) : सादळे-मादळे (ता.करवीर) येथे काल (मंगळवार) रात्री ९ च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रात्री जाखले येथील कामगार घरी जात असताना त्यांना रस्त्याकडेलाच बसलेला बिबट्या दिसला. त्यामुळे त्यांनी स्थानिक नागरिकांना त्वरीत जागे करुन याची माहिती दिली. या गावाच्या एका कॉर्नरला रस्त्यावरच बिबट्या बसल्याचे नागरीकांनीही पाहिले. यामुळे ते पुढे न जाता स्थानिक लोकांना याची माहिती दिली. काहींनी बिबट्या पाहिल्यानंतर सर्वांच्या आवाजाने हा बिबट्या झाडीत गेला. पण यामुळे येथील नागरीकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

याची माहिती वनविभागाला कळवली असून नागरीकांनी स्वत:ची काळजी घेण्याचे तसेच शेतात जाताने सावधानता बाळगण्याचे आवाहन येथील पोलीस पाटील दिपक परमित यांनी केले आहे.

अफवेला उधाण..

कासारवाडी सादळे मादळे डोंगरात वाघ मादी आणि नर तसेच त्यांच्या दोन पिल्लांचे दर्शन झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित झाला. आणि बघता-बघता सर्वत्र पसरला. पण हा व्हिडिओ खरा की खोटा हा संशोधनाचा विषय असून हा व्हिडिओ याठिकाणचा नसल्याचे काहींचे मत आहे. पण या व्हिडिओने सोशल मिडीयावर धुमाकुळ घातला आहे. पण शेवटी ही अफवा की खरा हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.