कोल्हापूर (प्रतिनिधी) : संपूर्ण भारत देश २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे उद्धिष्ठ असून यासाठी सर्वच निकषांवर उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोल्हापूर महानगपालिका महाराष्ट्रातील २२ महानगरपालिकेमध्ये प्रथम स्थानावर आली आहे. अशी माहिती क्षयरुग्ण अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी दिली. ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मिडीया कार्यशाळेच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी केले.

यावेळी डॉ. पावरा म्हणाले की, सरकारी दवाखान्यात निदान होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत खासगी दवाखान्याकडील रुग्णांची नोंदणी शासनाकडे करून घेणे आव्हानात्मक होते. यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी खासगी वैद्यकीय व्यवसायिकांच्या प्रत्यक्ष भेटी, मिटींग, कार्यशाळा घेऊन या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढवला.त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील जवळपास ९० ते ९५ टक्के खासगी दवाखान्यातील क्षयरुग्णांची नोंद करून घेणे शक्य झाले. शहरातील विविध मेडिकल असोसिएशन, खासगी औषध विक्रेते, अन्न व औषध प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचे क्षयरोग मुक्त अभियानामध्ये १३३ टक्के इतके विक्रमी काम झाले.

तसेच शहर क्षयरोग विभागातील अभिनय पोळ यांनी, दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, भूक मंदावणे, वजनातील लक्षणीय घट, संध्याकाळी येणारा ताप, बेडक्यातून रक्त पडणे, छातीत दुखणे, ही गंभीर लक्षणे दुर्लक्षित करून चालणार नाही. यासाठी सरकारी दवाखान्यात जाऊन थुंकी नमुन्याची मोफत तपासणी करून रोगाबाबत खात्री करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच खाजगी व वैद्यकीय व्यावसायिकांना क्षयरुग्णांच्या प्रत्येक रुग्णामागे पाचशे रुपये प्रोत्साहन भत्ता शासनामार्फत देण्यात येतो. शहर कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनतेने कोणतीही बहिष्काराची भावना मनात न आणता सहकार्य करावे. आणि निदान आणि औषधोपचारांसाठी लवकरात लवकर पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आरसीएच ऑफिसर  डॉ.अमोल माने,  सुशांत  कांबळे,  प्रविण क्रुझ, डॉ. इम्रान जमादार, मनिषा देसाई आदी उपस्थित होते.